गुरुवार, १५ डिसेंबर, २०११

काही क्षणात सागराला

कातरवेळी समुद्राकाठी मला
सुंदर कविता सुचली
हाती पेन पेन्सिल नसल्याने
वाळुतच ती मी लिहिली 

अशी कविता क्वचितच
कोणी केली असावी
जी वाचण्यासाठी सुर्यानेही
मावळतिची वेळ वाढवली

जे जे काही मनात होते
ते सर्व काही वाळूत कोरले
मनातल्या भावनांचे कोठार
काही क्षणात रिकामे झाले 

सुंदर अशी कलाकृती
त्या वाळूत साकार झाली
ढगात लपलेल्या चंद्राची
मग उत्कंठा शिगेला पोहचली 

आजूबाजूचे सर्व काही
त्या कवितेत तल्लीन झाले
त्याना जोडीला लाटेचे
छान पार्श्व-संगीत लाभले 

काही क्षणात सागराला
तुफान भरती येणार होती
अभय दिलेल्या शब्दाना आता
जीवंत समाधी मिळणार होती 

लाटेंच्या तडाख्यात प्रत्येक
शब्द धारतीर्थी पडला होता
फेसाळलेल्या लाटांत मी
शब्द जोडू लागलो होतो 

अजूनही ते शब्द जोडण्यासाठी रोज 
कातरवेळी समुद्राकाठी जातो
पुन्हा नवीन कविता रचून
तिला वाळूत पुरून येतो




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा